मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी जाहीर आवाहन करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कुणीही माझ्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर एकत्र येऊ नये, असेही राज यांनी म्हटले होते. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील एका मनसैनिकाने आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री प्रवीण चौगुलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच, कळव्यातील रुग्णालयात धाव घेतली.
ज्यावेळी मला समजलं तसं मी इकडे धावत आलो, तो 85 टक्के भाजला आहे. मी त्याच्या मित्रांशी बोललो. त्यावेळी राज ठाकरेंच्या ईडीप्रकरणामुळे माझी घुसमट होत असल्याचे त्याने म्हटले होते आज दिवसभर तो याच विचारात होता. हा प्रकार जर याच घटनेमुळे घडला असेल तर, ही खेदाची गोष्ट आहे, असं अविनाश जाधव म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांना, राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन की, कुणीही असं कुठलंही कृत्य करू नका. राज ठाकरेंना हे कृत्य कधीही आवडणार नाही. ते या कृत्याला कधीही दुजोरा देणार नाहीत. त्यामुळे कुणीही असे कृत्य करू नये, असं आवाहन ठाणे अविनाश जाधव यांनी केलं आहे.
तसेच, आत्महत्या केलेल्या मनसैनिकाला आई-वडिल नसून केवळ एक बहिण आहे. त्याच्या आईचाही जळून मृत्यू झाला होता. तर, वडीलही हयात नाहीत. तसेच, त्याच्या बहिणीशी आमचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे, मृत्यूनंतरचे इतर सर्व सोपस्कर आम्हीच पार पाडणार आहोत, असेही जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी आत्महत्येचे कारण माहित नसून तपास सुरू आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. तसेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे त्याने आपल्या जवळच्या मित्रांना सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-उदयनराजे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच- शिवेंद्रराजे भोसले
-मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला; अभिनेता रणवीर सिंगची कबुली!
-राज ठाकरेंना ईडीची नोटीस; ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या
-भारताविरूद्ध बोलताना सांभाळून बोला; डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना सल्ला!
-अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून बेपत्ता!