पास करण्यासाठी 2 प्राध्यापकांनी विद्यार्थिनीकडे चक्क शरीरसुखाची मागणी केलीय. नाशिकमधील पंचवटीतील महाविद्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीला पास करण्यासाठी महाविद्यालयातील 2 प्राध्यापकांनी या तरुणीकडे ही मागणी केली आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल-
पिडीत विद्यार्थिनीकडे प्राध्यापकांनी शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडित तरुणीने पोलीसात धाव घेतली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी प्राध्यापकांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने आरोप केलेल्या दोन्ही प्राध्यापकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.
महाविद्यालयाने आरोप फेटाळले-
तरुणीचे आरोप महाविद्यालयाने फेटाळून लावले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः हे आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थिनीने खोटी तक्रार दिल्यानं पत्र स्वतः प्राचार्यांनी पोलिसांना दिलं आहे. प्राचार्यांच्या या पत्रामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून तरुणीच्या आरोपांवर संशय निर्माण झाला आहे.
नेमका काय प्रकार घडला?
प्राध्यापक प्रवीण दादाजी सूर्यवंशी आणि सचिन निशिकांत सोनवणे यांनी पीडित तरुणीकडे 12 मध्ये नापास झालेल्या विषयात पास व्हायचे असल्यास शरीरसुखाची मागणी केली. वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याचा तसेच प्रात्यक्षिक सुरू असताना विनयभंग केल्याचा पीडित विद्यार्थिनीचा आरोप आहे.
1 जानेवारी 2015 पासून ते 18 सप्टेंबर 2018 असा सुमारे 3 वर्षांपासून दोन्ही प्राध्यापकांकडून माझा छळ सुरु आहे, असा आरोप देखील पीडित तरुणीने केला आहे. पीडित विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मंगळवारी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि प्राध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली.