राज ठाकरेंना उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर बोलवणाऱ्या विनय दुबेंना अटक

मुंबई : उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांना अटक करण्यात आली आहे. विनय दुबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार होते. मात्र त्याअगोदरच पोलिसांनी विनय दुबे यांना अटक केली आहे. विनय दुबे यांच्यासोबतच त्यांचे कार्यकर्ते योगेंद्र तिवारी यांनाही अटक केली. कल्याण पोलिसांनी दादरहून ही कारवाई केली. रविवारी या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

मनसेनं केलं ट्विट-

विनय दुबे यांना अटक केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका स्वीकारली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “श्री नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणार म्हणून उत्तर भारतीय महापंचायतच्या विनय दुबेंना पोलिसांनी पहाटे ४ वाजता अटक केली, ही कुठली हुकूमशाही? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांचं ट्विट-

विनय दुबे यांची फेसबुक पोस्ट-

विनय दुबे यांना अटक करण्यास कारण ठरलं ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार होते. उत्तर भारतीयांना अजूनही त्यांच्या हक्कासाठी वणवण भटकावं लागतं. देशभरात त्यांना अपमान सहन करावा लागतो. पंतप्रधान मोदी हे वाराणसी मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे मोदींना काळे झेंडे दाखवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधणार असल्याची फेसबुक पोस्ट विनय दुबे यांनी केली होती.

राज ठाकरेंना आमंत्रित केलं होतं-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या महापंचातीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. 2 डिसेंबरला त्यांनी उत्तर भारतीयांना हिंदीतून संबोधित केलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन विनय दुबे यांनी केलं होतं. राज ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रणही त्यांनी स्वतः दिलं होतं.

दुबेंनी उत्तर भारतीय नेत्यांना सुनावलं होतं-

विनय दुबे राज ठाकरेंच्या कार्यक्रमाअगोदरही एकदा चर्चेत आले होते. एका व्हिडीओद्वारे त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांना सुनावलं होतं. शिवाय राज ठाकरेंबद्दल गैरसमज पसरवण्यात आमचेच नेते कारणीभूत आहेत, असं म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावरही निशाणा साधला होता.

“अनेक उत्तर भारतीय हे ग्राऊंड लेव्हलचे आहेत. मनसेची बाजू त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे राज ठाकरे आमच्या मंचावर आल्याने अनेक उत्तर भारतीयांना त्यांची उत्तरं मिळतील. अनेक गोष्टी ग्राऊंडच्या उत्तर भारतीयांपर्यंत गाळून येते, त्यामुळे अनेक गैरसमाज निर्माण होतात. हे गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेतेही कारणीभूत आहेत. राज ठाकरे यांच्याशी सरळ संवाद साधल्याने उत्तर भारतीयांच्या मनातील अनेक शंका दूर होतील”, असा विश्वास विनय दुबे यांनी व्यक्त केला होता.