कन्हैय्या कुमारची राजकारणात उडी; लोकसभा निवडणूक लढवणार

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आता राष्ट्रीय राजकारणात उडी घेणार आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक कन्हैया कुमार लढणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. सर्व डाव्या संघटनांचं याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. बेगूसराय या बिहारमधील मतदारसंघातून सीपीआयच्या तिकीटावर कन्हैय्या कुमार निवडणूक लढवेल, असं सांगितलं जातंय. 

काँग्रेस आणि राजदचाही पाठिंबा?-

युवा नेत्यांमध्ये कन्हैया कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. मोदी सरकारविरोधी आघाडी तयार करण्याचे सध्या विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये काँग्रेसच्या जोडीला डावे आल्यास आश्चर्य वाटणार नाही. काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमार निवडणूक लढवेल. कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीबाबत लालू प्रसाद यादव यांनाही कळवण्यात आल्याचं कळतंय. त्यांनीही कन्हैया कुमारच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. असं असलं तरी याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

बेगुसरायमध्ये सध्या कोणाचा कब्जा?-

बिहारमधील बेगुसराय हा एक लोकप्रिय मतदारसंघ आहे. सध्या याठिकाणी भाजपचे खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे भोला सिंह या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं झालं तर या मतदारसंघात भोला सिंह विरुद्ध कन्हैया कुमार असा सामना रंगू शकतो.

सीपीआयमध्ये कन्हैया कुमारला मानाचं स्थान-

राष्ट्रीय राजकारणात उडी घेणाऱ्या कन्हैय्या कुमारला सीपीआयने पक्षात मानाचं स्थान दिलं आहेय. एप्रिल महिन्यात त्याला सीपीआयने आपल्या राष्ट्रीय परिषद जागा दिली आहे. राष्ट्रीय परिषदेत एकूण 125 सदस्य आहेत. त्यामुळे कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं सांगितलं जातंय.

 

“जर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या संघटनांनी महाआघाडी केली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे- कन्हैय्या कुमार (काही महिन्यांपूर्वी)