“गेल्या सरकारमधील काहीजण महापोर्टलमध्ये हस्तक्षेप करून आपापल्या परीक्षार्थींना उत्तीर्ण करत आहेत”

मुंबई | काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल लवकरात लवकर बंद करण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यासंबंधीचं निवेदनही सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं. आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही महापोर्टल बंद करण्याची मागणी केली आहे.

मध्य प्रदेशमधील व्यापम आणि महाराष्ट्राचं महापोर्टल याच्यामध्ये काहीच फरक नाही. गेल्या सरकारमधील काहीजणांनी महापोर्टलमध्ये हस्तक्षेप करूण आपापल्या परीक्षार्थींना परीक्षेत उत्तीर्ण करून महत्वाच्या पदावर पाठवण्याची सोय महापोर्टलच्या माध्यमातून केली आहे, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये कामगार आणि शेतकरी कुटूंबातील विद्यार्थी असतात. मात्र केवळ बापाचा वशिला नाही म्हणून उत्तीर्ण होऊ शकणार नसतील तर त्यांच्या आयुष्याशी आपण खेळत आहोत. सरकारनं लवकरात लवकर महापोर्टला लगाम घालून पुर्वीच्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देवून परीक्षा घ्याव्यात. महापोर्टल हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंनी महापोर्टल बंद करण्याची मागणी केल्यावर आता सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-