काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच; गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का

पणजी : कर्नाटक पाठोपाठ आता गोव्यातही काँग्रेसला खिंडार पडले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.

गोवा विधानसभेतील या राजकीय भूकंपामुळे भाजप आमदारांची संख्या आता 27 झाली आहे. हे सर्व आमदार आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी भाजपमध्ये आले आहेत, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

काँग्रेसच्या 10 आमदारांनी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला, असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळं हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचं मानलं जात आहे. 15 पैकी 10 म्हणजे दोनतृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही.