जिओचा ग्राहकांना आणखी एक धक्का!

मुंबई | रिलायन्स जिओने दूरसंचार सेवेच्या दरांमध्ये वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर आता रिलायन्स जिओ फायबर युजर्सनाही दणका बसला आहे. जिओ फायबर युजर्सना आता ‘फ्री ब्रॉडबँड’ सेवा मिळणार नाही.

कंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी दर आकारण्यास सुरूवात केली आहे. यासोबतच कंपनीने  जिओ फायबरची सेवा आधीपासूनच वापरणाऱ्या ग्राहकांनाही ‘टॅरिफ प्लॅन’ निवडण्यास सांगितलं आहे. अन्यथा सेवा बंद होईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

अधिक नफा मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मेट्रो शहरांतील जिओ फायबरचे ग्राहक ज्यांनी 2500 रुपये डिपॉझीट दिलंय त्यांच्याकडून आता पैसे आकारले जात असल्याचं कळतंय.

दरम्यान, येत्या काही आठवड्यांमध्ये देशभरात कमर्शिअल बिलिंगची सुरूवात केली जाणार आहे. कंपनीकडून आपल्या 5 लाख जिओ फायबर युजर्सना ‘टॅरिफ प्लॅन्स’मध्ये शिफ्ट केलं जात आहे, म्हणजेच त्यांच्याकडून आता दर आकारले जाणार असल्याची माहिती आहे.