सिंचन घोटाळ्याच्या त्या अहवालात नेमकं काय म्हटलंय???

नागपूर : राज्यात गेली चार वर्षे सिंचन घोटाळ्याबाबत चर्चा आहे. विदर्भातील गोसी खुर्द आणि जीगाव सिंचन प्रकल्पात घोटाऴयात अजित पवार, सुनील तटकरे यांच्या सहभागाबाबत आरोप झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली या घोटाळ्याची एसीबीमार्फत चौकशी करणार असल्याचं महाधिवक्तांच्यामार्फत न्यायालयात सांगितले होते. एसीबीच्या वतीने प्रथमच अजित पवार यांच्या बद्दल भूमिका मांडली. एसीबीच्या वतीने महासंचालक संजय बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर शपथपत्र मांडले. शपथपत्रात अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हटलंय शपथपत्रात?-

अजित पवार यांच्या सहीने सिंचन प्रकल्पाची कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या तसेच गाेसी खुर्द प्रकल्पाच्या कामात सुमारे 182.9630 कोटी आणि जीगाव प्रकल्पात 12.11 कोटी रुपये कंत्राटदाराला मोबलायझाशेन अॅडव्हान्स देण्यात आले, हे मोबलायझाशेन अॅडव्हान्सच्या प्रस्तावावर निर्णय सचिवामार्फत होणं आवश्यक असताना, मोबलायझाशेन अॅडव्हान्स अजित पवार यांच्या सहीने दिल्याचं शपथपत्रात मांडण्यात आलं आहे.

अजित पवार यांची भूमिका-

सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवार यांनी जलसंपदा विभागाचा मंत्री असताना आपण सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी शिफारस केल्यानुसार निर्णय घेतले असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकार कामकाज नियमातील कलम 14 नुसार सिंचन प्रकल्पाबांबत घेतलेल्या निर्णयांना सचिव जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

काय झालं गोसी खुर्द आणि जीगाव प्रकल्पात?

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांकडून सरकारची या कामांना तांत्रिक मंजूरी घेण्यापूर्वीच अनेक कामांच्या निविदा वृत्तपत्रांत प्रकाशित करण्यात आल्या. अपात्र कंत्राटदार, संयुक्त उपक्रम कंपन्यांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. निविदांमध्ये दाखवण्यात आलेल्या मूल्यापेक्षा 5 टक्के जास्त दराने भरलेल्या गोसी खुर्द प्रकल्पातील 145 निविदा मंजूर करण्यात आल्या. यामुळे 480 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकार पडला अस मेंढगिरी समितीनं म्हटलं आहे.

चौकशीसाठी जनहित याचिका दाखल-

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून जनमंच व अतुल जगताप यांनी या घोटाळ्याची सीबीअायमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी न्यायालायत जनहित याचिका दाखल केली होती. 

न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे! अजित पवार यांची प्रतिक्रिया

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून नागपूर खंडपीठात खटला सुरु असल्यानं त्याबाबत मी फार काही बाेलणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चौकशीला मी यापुढेही सहकार्य करेन, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.