अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!

नवी दिल्ली | भारतात कोरोना संकटामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू झाले. या अशा संकटाच्या परिस्थितीत अभिनेता सोनू सूद मदतीस धावून आला. विविध शहरातील प्रवासी मजूर त्यांना काहीही वाहन उपलब्ध न झाल्याने आपापल्या घरी चालत जात होते.

ही गोष्ट सोनू सूद यांच्या मनात कुठेतरी खोलवर रुजली आणि तेव्हापासून त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली. सोनू सूद यांची मदत तिथेच थांबली नसून ती आजही विविध माध्यमातून चालूच आहे. या सर्व कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.

संकटाच्या काळात सढळ हाताने सामाजिक कार्य करणाऱ्या सोनू सूद यांना युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (युएनडीपी) यांच्या प्रतिष्ठित एसडीजी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) स्पेशल ह्युमनटॅरिअन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सोनू सूद यांना हा पुरस्कार २८ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल समारंभात देण्यात आला. या सन्मानानंतर सोनू सूद आनंद व्यक्त करत म्हणाले,”हा माझ्यासाठी खूपच खास सन्मान आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे हा सन्मान मिळणे ही खूपच विशेष गोष्ट आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता देशातील नागरिकांसाठी मला जेवढं थोडफार करता आलं, ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.”

पुढे बोलताना सोनू सूद म्हणाले,”पुरस्कार मिळणे आणि आपल्या कामाला सन्मान मिळणे ही सुखद गोष्ट आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मी समर्थन करतो. संयुक्त राष्ट्राने पृथ्वी आणि मानव जातीसाठी निर्धारित केलेल्या सर्वच गोष्टींचा फायदा सर्वांनाच होणार आहे.”

आपण सर्वांनी सोनू सूद यांना अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पाहिलं आहे. पण सध्याच चित्र काहीसं वेगळंच आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यात सोनू सूद नायकाची भूमिका बजावताना दिसत आहे. नुसत्या स्थलांतरित नागरिकांनाच घरी पोहोचवले नाही तर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना घरी पोहोचवण्याचे काम सोनू सूद यांनी केले आहे.

ज्या वेळी देशात टाळेबंदी झाली होती, त्यावेळी अनेक विद्यार्थी परदेशात अडकले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना थेट विमानाची सोय उपलब्ध करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. सोनू सूद यांची मदत एवढ्यावरच न थांबता ग्रामीण भागात लोकांच्या राहण्याची सोय केली, प्रवासी मजुरांना नोकरी आणि राहण्यासाठी घर दिले. एकूणच सोनू सूद यांच्याकडे मदतीला येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता मदत केली.

सोनू सूद यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार याआधी हॉलिवूडमधील विविध कलाकारांना देण्यात आलेला आहे. एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डाय कॅपरिओ, एम्मा वॉटसन, लियाम निसन, कॅट ब्लँचेट, एंटोनियो बँड्रास, निकोल किडमॅन आणि प्रियांका चोपडा अशा दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस

‘रिया शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती’; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या