मुंबई | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद दौऱ्याला जळगावमधून सुरूवात झाली आहे. जनआशीर्वाद यात्रा ही राज्य सरकारमधील कोणतंही पद मिळविण्यासाठी नाही तर मला महाराष्ट्र घडवायचा आहे, असं वक्तव्य आदित्य यांनी केलं आहे. तर या वक्तव्याच्या अगदी विसंगत वक्तव्य शिवसेना नेेते संजय राऊत यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा म्हणजे शिवसेनेचा महाराष्ट्रावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विजयाची सुरूवात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी आदित्य यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अप्रत्यक्षरित्या घोषितच केलं आहे.
महाराष्ट्राचं नेतृत्व आदित्य यांनी करावं ही जनभावना आहे आणि महाराष्ट्रातील लोकांची ती सुप्त इच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मला काहीतरी बनायचं आहे म्हणून ही यात्रा काढलेली नाही तर मला महाराष्ट्र घडवायचा आहे. मला मराठी माणसासाठी काम करायचंय. कोणताही मुहूर्त, तारीख न पाहता मी बालेकिल्ल्यातून सुरूवात केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात युतीच्या जागा वाटपाविषयी चर्चा झाली आहे. जागा वाटपाचा नवीन फाॅर्म्युला लवकरच समोर येईल, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन शिवसेनेने ही यात्रा काढली आहे.
महत्वाच्या बातम्या-