मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना डबघाईला आली आहे. 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत बंड केलं व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पाय-उतार व्हावं लागलं.
आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली असताना अनेक आजी-माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्षांनीही शिंदे गटाची वाट धरली. यात भर घालत 12 खासदारांनीही शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेला पडलेलं भगदाड अधिकच वाढलं.
शिवसेनेला सुरूंग लावत भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. तर या बंडाळीमुळे शिवसेनेने गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आता स्वत: मैदानात उतरले आहेत.
आदित्य ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निष्ठा यात्रेती सुरूवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आदित्य ठाकरेंनी स्वत:ला पक्षाच्या कामात झोकून दिलं आहे.
बुधवारी रात्री वडाळ्यात सभा घेताना अचानक पाऊस बरसला. यावेळी आदित्य ठाकरेंनी पावसाची परवा न करता कार्यकर्त्यांशी संवाद चालू ठेवला. आदित्य ठाकरेंच्या या सभेमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भरपावसातील सभेची आठवण झाली.
खासदारकीच्या प्रचारासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते. त्यावेळीही अचानक पाऊस सुरू झाला पण शरद पवारांनी वयाच्या 80व्या वर्षी पडत्या पावसात सभेला संबोधलं. यानंतर एक भावनिक लाट उसळलेली पाहायला मिळाली.
शिवसेनेची जी सध्याची अवस्था आहे त्याच प्रमाणे तेव्हा राष्ट्रवादीत देखील फूट पडत होती. मात्र, शरद पवारांच्या पावसातील सभेने लोकांची मनं जिंकली होती. आदित्य ठाकरेही अशाच प्रकारे पक्ष वाचवण्यासाठी झटत असून त्यांनीही पडत्या पावसात सभा घेतली. त्यामुळे आता आदित्य ठाकरेही जनतेचं मन वळवणार का?, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत हे सरकारही कोसळणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. तर बंडखोर आमदारांमध्ये लाज व हिंमत असेल तर आमदारकिचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवा, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त
कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ
‘उद्धव ठाकरेंनी ‘ती’ मोठी चूक केली’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य