महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार अॅड. उज्ज्वल निकम?, जळगाव लोकसभेसाठी चर्चा

मुंबई |काँग्रेस-राष्ट्रवादीचं लोकसभेसाठीचं जागावाटप ठरलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता आपल्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये आघाडी घेतली असून काल झालेल्या बैठकीत लोकसभेच्या ६ मतदारसंघांबाबत चर्चा झाली. यामध्ये जळगावच्या जागेसंबंधीत तपशील आता बाहेर आला असून एक आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा झाली. 

राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाच्या नेत्यांची हजेरी?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील पक्ष कार्यालयात पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या या बैठकीला जळगाव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, माजी आमदार संतोष चौधरी आदी उपस्थित होते. दुपारी साडेबाराला जळगाव व रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली.

जळगावसाठी कुणाची नावं चर्चेत?

जळगाव लोकसभेसाठी माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील, चाळीसगाव येथील प्रमोद पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांचं नाव सुचवण्यात आलं आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्याही नावाबाबत चर्चा करण्यात आली.

निकम यांच्या बोलूनच निर्णय होणार-

जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड उज्ज्वल निकम यांच्या नावाबाबतही चर्चा करण्यात आली. त्यांचे नाव सुचविण्यात आल्यानंतर त्यावर सहमती झाली. मात्र अॅड. उज्ज्वल निकम यांची सहमती घेतल्यानंतरच त्यासंदर्भात पुढील प्रक्रिया करण्यात येईल. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्याकडे अॅड. निकम यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निकम यांचा नकार आल्यास अनिल भाईदास पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असं कळतंय.

‘रावेर’ मोठ्या नेत्यांच्या प्रवेशासाठी राखीव-

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. मात्र राज्यात वर्चस्व असलेल्या सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने ऐनवेळी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यासाठी हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात येईल, ते सांगतील त्यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

IMPIMP