नाशिक महाराष्ट्र

पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका

नाशिक – राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाच्या संबोधल्यानंतर सुरु झालेला वाद चांगलाच भडकला आहे. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरवॉर सुरु झालं असून हा वाद आता टोकाला पोहोचला आहे. 

अजित पवारांनी महाजनांना नाच्या संबोधल्यानंतर भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पवार यांचे आक्षेपार्ह पोस्टर थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा जोरदार निषेध केला.  तसेच जशास तसे उत्तर म्हणून शहाणे यांच्या पोस्टर्सवर चक्क लघुशंका केली. तसेच कार्यालयाबाहेरील पोस्टरचे दहन करून शहाणेंचा तीव्र शब्दांत निषेध केला. या दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेल्या या वादामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार-

संसदेत कलम ३७० रद्द करण्यासंदर्भातील विधेयक मांडल्यानंतर गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष केला होता. ढोल-ताशांच्या गजरावर महाजन यावेळी थिरकले होते. त्यांच्या याच कृतीचा अजित पवार यांनी जुन्नरच्या सभेत समाचार घेतला होता.

नाशिकमध्ये पूर आला आहे आणि मंत्रिमहोदय नाचत आहेत. नाच्याचं काम तुमचं नाही तुम्ही पाण्याचं बघा, असं अजित पवार म्हणाले होते. 

पोस्टरवर केली लघुशंका-

भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी बुधवारी पवार यांच्याविषयी असभ्य भाषा लिहिलेले फलक शहरात लावले होते. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी एक फलक थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहाणे यांनी काही ठिकाणी लावलेल्या पोस्टर्सवरच लघुशंका करून त्यांच्या कृतीचा निषेध केला. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लावलेले पोस्टर काढून त्यांचं दहन केलं.

भाजपवाल्यांनो, सत्तेचा माज करू नका. आम्ही तुमच्यासारखे असभ्य नाही. अन्यथा तुमच्या घरात घुसून उत्तर देऊ. पातळी सोडाल, तर आमचाही हिसका दाखवू, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक आघाडीचे पुरुषोत्तम कडलग, शाकेरा शेख, सुजाता गाढवे, संगीता गांगुर्डे, दीक्षा दोंदे, पुष्पा राठोड यावेळी उपस्थित होते. 

मात्र शहाणे सापडलेच नाहीत-

नगरसेवक शहाणे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरच पोस्टर लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पहिल्यांदा शहाणेंचा शोध सुरू केला. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी हातात बांगड्या आणि शाई घेऊन महापालिकेत धाव घेतली मात्र शहाणे महापालिकेत सापडले नाहीत त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने मागं फिरावं लागलं. 

महत्वाच्या बातम्या-

-रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…

-पाक लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा का?; इम्रान खान यांचा सवाल

-माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी

-राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर

-“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”

IMPIMP