पुणे | शरद पवार येऊ द्या किंवा अजित पवार येऊ द्या… असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मस्तीच जिरली, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला. याचेच उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना निराश होऊ नये, असं सांगितलं.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि हाच नियम मनाशी बाळगून राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम केलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महापालिकेतच नाही तर आपली सत्ता राज्यातसुद्धा येऊ शकते. त्यासाठी आळस झटकून कामाला लागा, असा आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
अजित पवार यांच्या समोर काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कुरापती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू अजित पवारांनी त्यांना दम भरत ही असली दुखणी सांगायचं बंद करा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी भाषणं करा, असं म्हटलं.
माझ्यासमोर आता कोणत्याही नेत्याने आणि पदाधिकाऱ्यांनी कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. एकमेकांची गाऱ्हाणी सांगायची नाहीत. आता फक्त जबाबदारीने कामाला लागायचं, असं ते म्हणाले.
दरम्यान, लोकांची अनेक कामे असतात. शहराध्यक्षांनी कार्यालयात भेटले पाहिजे, असं म्हणत त्यांनी हळूच चिमटा काढला.
महत्वाच्या बातम्या-