मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
चाकण दंगल प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. याठिकाणी वातावरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
चाकण दंगल प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण कुणाला टार्गेट करु नका, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठा क्रांती मोर्चाचं लोण महाराष्ट्रात पसरलेलं असताना ३० जुलै २०१८ रोजी चाकणमध्ये मराठा समाजाने मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात मोठा हिंसाचार झाला होता. एसटी बसेससह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती.
मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये देखील चकमक झाली होती. या हिंसाचाराची झळ पोलिसांना देखील सहन करावी लागली होती.
हिंसाचार शमल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली, ज्यामध्ये गुन्हे दाखल करुन ८४ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
आता याच हिंसाचाराचा ठपका दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठेऊन त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिलीप मोहितेंना अटक होऊ शकते हे लक्षात येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जागोजागी निषेध सभांचं आयोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, गृहमंत्रीपद स्वतःकडेच असलेले मुख्यमंत्री कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रकरणात दिलीप मोहिते यांच्या विरोधात ठोस धागेदोरे हाती आले असतील तर त्यांच्या अटकेची कारवाई होऊ शकते, असं मानलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-