…तर मी पवारांची औलाद नाही- अजित पवार

बीड : विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाल्यामुळे दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. आमचं सरकार सत्तेवर आलं, की सहा महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिलं. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते.

तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही एवढं कडक सांगताय, काय तुम्ही करणार? आमचं सरकार सत्तेवर आलं, तर आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही, अशी गर्जना अजित पवारांनी केली.

आम्ही पहिल्यांदा करुन दाखवलंय, या लोकांची करुन दाखवण्याची दानत नाही. यांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या 16 हजार आया-बहिणी विधवा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा सांगा. काय केलं होतं त्या शेतकऱ्यांनी? का ही परिस्थिती निर्माण झाली?, असा सवालही अजित पवारांनी विचारला.

ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केलं.