पवारांच्या तिसऱ्या पिढीची राजकारणात एन्ट्री, पार्थ पवार मावळमधून लढणार?

मुंबई | पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीने राजकारणात एन्ट्री मारली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार राजकारणात सक्रीय झालेले असताना आता शरद पवार यांचे दुसरे नातू पार्थ पवार यांच्या राजकारण प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. पार्थ पवार अजित पवार यांचे पूत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचं कळतंय. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या गोटात याची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. 

मावळमध्ये काय परिस्थिती आहे?

मावळमध्ये सध्या शिवसेनेचा खासदार आहे. श्रीरंग बारणे हे 2014 साली या ठिकाणावरुन निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने याठिकाणी राहुल नार्वेकर यांना तिकीट दिलं होतं. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. दुसऱ्या क्रमांकावर शेकापतर्फे उभे राहिलेले लक्ष्मण जगताप होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी झाली तर राष्ट्रवादीला ही जागा निवडून आणणं जड जाणार नाही, असा अंदाज आहे. 

पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. शरद पवार यांच्यासह ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. शरद पवार त्यांना राजकारणाचे धडे शिकवत असावेत, असं बोललं जातंय.

पवारांचा दुसरा नातूही राजकारणात-

पार्थ पवार यांच्याशिवाय शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार सुद्धा राजकारणाच्या रिंगणात उतरले आहेत. ते सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते आमदारकीसाठी प्रयत्नशील असल्याचं कळतंय. येत्या निवडणुकीत त्यांना कोणत्या जागेवरुन उतरवायचं हा राष्ट्रवादीपुढील मोठा प्रश्न आहे. रोहित पवार बारामतीसाठी आग्रही असल्याचं कळतंय. मात्र अजित पवार पुतण्यासाठी बारामती सोडणार का? अशा चर्चांना नुकतंच उधाण आलं होतं. 

मुलाच्या उमेदवारीवर काय म्हणाले अजित पवार?

पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. पार्थ पवारांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला नाही. आपल्याला माहीत नाही. लोकशाही आहे. लोक काय म्हणतात ते पाहू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ यांच्या उमेदवारीची चर्चा अजित पवार यांनी थेट फेटाळली नाही त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.