पुणे : आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजपने शरद पवारांना लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहांनी भाजप आयटी सेलला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर त्यांना लगेच प्रत्युत्तर द्या, अशा सूचना अमित शहांनी भाजपच्या आयटी सेलला दिल्या आहेत. त्यामुळे शरद पवार हे यापुढे भाजपचं मुख्य लक्ष्य असणार आहे.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भाजपच्या आयटी सेलचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अमित शहांनी उपस्थिती लावली. राज्यभरातून जमलेल्या भाजपच्या आयटी सेल कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी संबोधित केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.
शरद पवारांच्या काळात जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या, त्याची तुलना अमित शहांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्यांसोबत केली. शरद पवारांच्या काळाच्या तुलनेत फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये 33 टक्क्यांची घट झाल्याचा दावा अमित शहा यांनी यावेळी केला.
पोस्ट टोकदार करण्याच्या सूचना-
या पुढील काळात भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पोस्ट टोकदार कराव्या असं त्यांनी म्हटलं. यापुढे निवडणूक ही सोशल मीडियामधून लढवली जाणार आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणारी फौज आपल्याकडे तयार पाहीजे. सोशल मीडिया वापरता येतो एवढं चालणार नाही, तुम्हाला काय करायचं हे माहीत असायला हवं. हेतू साध्य करण्यासाठी पोस्ट टोकदार असल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
सरकारविरोधी बातम्यांवर प्रत्युत्तर द्या-
अमित शहांनी फक्त शरद पवार यांनाच लक्ष्य करण्यास सांगितलं नाही. तर सरकारविरोधी बातम्या छापणाऱ्या माध्यमांना प्रत्युत्तर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सरकारविरोधी बातम्यांना योग्य पद्धतीने प्रत्युत्तर द्या, असं ते म्हणाले.