महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंचा करिष्मा संपला??? अमित ठाकरेंना मैदानात उतरवण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरेंसह मनसेच्या नेत्यांनी नवी सुरुवात केलीय. मनसेच्या नेत्यांची याचसंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना राजकारणाच्या मैदानात उतरवण्याची मागणी करण्यात आली. 

राज ठाकरेंच्या एकहाती करिष्म्यावर मनसेचा गाडा आजपर्यंत ओढला गेला. मात्र राज ठाकरे यांचा करिष्मा कमी पडतोय की काय? अशी शंका आता उपस्थित होतेय. तरुणांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना राजकारणात उतरवण्याची मागणी होतेय. खुद्द मनसेच्या नेत्यांनी ही मागणी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच आपल्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवलं. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आपला मुलगा आदित्य ठाकरेला राजकारणात आणत सगळे डावपेच शिकवले आहेत. मनसेकडे राज ठाकरे वगळता कोणताही मोठा चेहरा नाही जो तरुणांना आकर्षित करु शकतो. 

अमित ठाकरेंना राजकारणात उतरवायचं की नाही? याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे यांच्याकडेच असेल. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.