पुणे महाराष्ट्र

शिवसेनेकडून छत्रपतींच्या गादीसोबत बेईमानी करण्याची ऑफर; अमोल कोल्हेंचा धक्कादायक खुलासा

मुंबई : शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढत मोठी लक्षवेधी ठरत आहे. विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी नाकीनऊ आणले आहे. आता डॉ. अमोल कोल्हे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलास्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातात का घेतले? याबद्दलचा खुलासा अमोल कोल्हे यांनी शनिवारी केला आहे. शिवसेनेने मला उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न केला होता, असं त्यांनी सांगितलं आहे.

“त्याच क्षणी त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नसल्याचं सांगत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली”

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सांगता सभेत बोलत असताना अमोल कोल्हे यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची सांगता झाली. या सभेत बोलताना डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यावर आत्‍तापर्यंत मौन धरण करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हा खुलासा केला. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा अशी विचारणा होते. पण सातार्‍यातुन निवडणूक लढवणार का? हे शिवसेनेकडून विचारण्यात आले होते. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडली, असं ते म्हणाले. 

सांगता सभेत बोलतान अजित पवार यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र बाबा इथं येऊन बघ किती शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. नुसतं पोपट वाणी बोलू नका. मुख्यमंत्री झाल्यापासून ते जॅकेट घालू लागलेत. त्यांनी ते घालावं पण शेतकऱ्यांची फसवणूक का केली. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसली. त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही. विजेचे दर वाढवले. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सांगा, गेल्या ५ वर्षात माझ्या पुणे जिल्ह्यात कोणती नवी इंडस्ट्री आली? मागच्या वेळेस फसलात, यंदा फसू नका! आपली नाणी खणखणीत दिली आहेत. ती खणखणीत वाजलीच पाहिजेत!

डॉ अमोल कोल्हे यांना निवडून दिलं तर दोन-दोन काम होणार. एकतर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तर ते पण सुटणार आणि काही दुखत असलं की लगेच इंजेक्शन, इलाज. त्यांना लगेच आठवण करून द्यायचं घड्याळ्याचं बटन दाबलं होतं, असे अजित पवार म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

हे वाचलं का? 

IMPIMP