लोकांच्या जीवाशी खेळ; अंधेरीत पुलाचा मोठा भाग कोसळला

मुंबई : अंधेरीमध्ये भर पावसात गोखले पुलाचा मोठा भाग कोसळला आहे. रेल्वे रुळांवरच हा भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल सुरु झाले आहेत. 

नेमकं काय घडलं?

सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक अपघात घडला. गोखले पुलाला दोन्ही बाजूंनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी काही भाग ठेवण्यात आला आहे. यापैकी एका बाजूचा भाग कोसळला आहे. त्यामुळे अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्टकडे या पुलावरुन होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. 

बचावकार्य सुरु; 4 जखमी-

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुलाच्या कोसळलेल्या मलब्यामुळे अनेकजण जखमी झाल्याचं कळतंय. 4 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील एक महिला गंभीर जखमी आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम-

रेल्वे रुळांवरच पुलाचा हा भाग कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगाव लोकल वाहतूक सुरु आहे, मात्र वांद्रे ते गोरेगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आहे. मुुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्ते वाहतूक कोलमडली आहे, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना पहायला मिळत आहेत.