राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

रायगड | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आज आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी राजीनामा दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. काही दिवसांपूर्वी अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांचे ते पुतणे आहेत. त्यामुळे सुनील तटकरेंसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर अवधूत तटकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी ते सेना भवनाकडे रवाना झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र कोणते ते नंतर सांगू, असे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं.

अवधूत तटकरे यांनी गेल्या गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं अवधूत यांनी भेटीनंतर सांगितलं होतं. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं.