कपिल पाटील यांची विजयश्री आणि चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांचे हिशेब चुकते!

मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीच्या कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. याठिकाणी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना टक्कर देत विजय मिळवला आहे. हा विजय वाटतो तितका सोपा नव्हता, कारण कपिल पाटील यांच्या पराभवासाठी भाजपनं जंगजंग पछाडलं होतं.

कपिल पाटील विधान परिषदेतील अभ्यासू आणि चतूर आमदार म्हणून ओळखले जातात. अनेक वाहिन्यांवरही त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले जाते. विधान परिषदेत सरकारला खिंडीत गाठणाऱ्यांमध्ये कपिल पाटील यांचे नाव घ्यावेच लागेल. सत्ताधारी पक्षाला अडचणीचे प्रश्न विचारण्यात त्यांचा हातखंडा आहे. 

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून कपिल पाटील यांनी अवघड प्रश्न विचारुन भाजपच्या मंत्र्यांना अनेकदा अडचणीत आणले होते. सरकारमधील नंबर दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही कपिल पाटलांनी अनेकदा अडचणीचे प्रश्न विचारले होते. यातून कपिल पाटील आणि या दोन नेत्यांमध्ये अनेकदा हमरीतुमरी झाली होती. एकदा तर चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप कपिल पाटलांनी केला होता. 

पाहा व्हीडिओ-

https://youtu.be/gpFCAc49m6c

विनोद तावडे यांच्यासोबतही कपिल पाटील यांनी पंगा घेतला होता. स्वतः शिक्षक आमदार असल्याने ते शिक्षण खात्याशी संबंधित अडचणीचे प्रश्न विचारुन तावडेंना अडचणीत आणत असत. तावडे कपिल पाटील यांच्यावर वैतागल्याचं अनेक अधिवेशनांमध्ये पहायला मिळालं आहे. एकंदरच या दोन नेत्यांसोबतचा त्यांचा संघर्ष विकोपाला गेला होता. 

पाहा व्हीडिओ-

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच कपिल पाटील निवडून येऊ नयेत यासाठी प्रयत्न होणार हे सर्वश्रृत होतं. भाजपच्या हातात सत्ता असल्यामुळे कपिल पाटील यांना त्यांचा सामना करणं अवघड होतं. शिवसेनेच्या हातात महापालिका असल्यामुळे त्यांचाही जोर होता. कपिल पाटलांच्या विरोधात भाजपनं अपक्ष अनिल देशमुख यांना पाठिंबा दिला. स्वतः चंद्रकांतदादा आणि तावडे यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याचं सांगितलं जातं. एवढंच नव्हे तर कपिल पाटील पराभूत कसे होतील?, यावर दोन्ही नेत्यांचा भर होता, असंही सांगितलं जातं.

कपिल पाटलांच्या पुढे शिवसेना आणि भाजप अशा दोन बलाढ्य पक्षांचं आव्हान होतं. ते स्वतः लोकभारतीचे उमेदवार होते. कपिल पाटलांकडे होता फक्त अफाट जनसंपर्क आणि त्यांचं काम. आम्हीच जिंकणार अशा वल्गना दोन्ही पक्षांकडून केल्या जात होत्या, मतमोजणीनंतर मात्र वेगळंच चित्र समोर आलं. कपिल पाटलांनी विजयश्री मिळवली होती. मुंबई शिक्षक मतदार संघात एकूण मतदान 8 हजारपेक्षा जास्त झालं. एकट्या कपिल पाटलांना यापैकी 4 हजार पेक्षा जास्त मतं मिळाली. 

सत्ता, पैसा आणि ताकद यापैकी काहीही न वापरता निवडून येता येतं, हे कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. शिक्षक मतदारांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीवर आणि कामावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. दुसरीकडे सत्तेचा घमंड मात्र चक्काचूर होताना पहायला मिळाला. 

-संपादकीय टीम, महाराष्ट्र केसरी