सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड

सिंधुदुर्ग | राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद कायम चर्चेत असतो. सध्या हा वाद काहीसा शांत झालेला आहे असं वाटत असताना आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात ही शिवसेनेपासून केली होती. त्यांच्यातील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संबंध अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.

अशात आता पुन्हा एकदा राणे हे बाळासाहेबांच्या फोटोमुळं चर्चेत आले आहेत. काही दिवसांपुर्वीच नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

जिल्हा बॅंकेत सत्ता स्थापन झाल्यावर आता मुख्यालयात लावण्यात आलेल्या फोटोंवरून वाद निर्माण झाला आहे. बॅंकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो गायब झाले आहेत.

बॅंकेचे मावळते अध्यक्ष हे शिवसेनेचे असल्यानं त्यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या या नेत्यांचा फोटो होता. पण भाजपची सत्ता येताच फोटो काढण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून त्याजागी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावल्यानं शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राणे नेहमीच बाळासाहेब यांच्याबद्दल आदर असल्याचं सांगत असतात पण आता वेळ आल्यावर त्यांनी आपली प्रवृत्ती दाखवल्याची टीका नाईक यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग बॅंकेची निवडणूक संतोष परब हल्ला प्रकरणानं गाजली होती. संतोष परब यांच्यावर हल्ल्याचा कट बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष मनिष दळवी यांनीच यशस्वी केल्याचं नाईक म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणुकीवेळी निर्माणा झालेला वाद अद्याप कायम असताना आता हा फोटोंचा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून राणे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल