जळगाव | अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर भारतीय जनता पार्टीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर खडसे आज जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप पक्षांतर्गत माझ्या विरोधात चाललेल्या कट कारस्थानाचे पुरावे मी पक्षाला दिले. मात्र, तरीदेखील पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता पक्षाला माझी गरज नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या पक्षांतराविषयी चर्चा चालू आहेत. मात्र, तरी देखील कोणीही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ चंद्रकांत पाटील हे मला फोन करून यातून मार्ग काढू असं म्हटले. पण अखेरपर्यंत त्यांनी मार्ग काढला नाही, असं खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पक्षांतर्गत माझ्यावर होत असणाऱ्या अन्यायाची मी अनेकवेळा दिल्लीत जाऊन गाऱ्हाणी मांडली आहेत. अमित शहा, नरेंद्र मोदी यांना भेटून माझ्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी नेहमी मला तुम्ही फडणवीसांना घेवून या आपण यातून मार्ग काढू, असं सांगितलं. मात्र, दिल्लीला जाण्याच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी नेहमी मला टोलवाटोलवीची उत्तरं दिली, असंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप करण्यात आले. मात्र, केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगितले. इतर सर्व नेत्यांना क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांच्यात आणि माझ्यात भेदभाव का?, असा सवाल खडसे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी पाटील काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ खडसे हे गेल्या कित्येक दशकांपासून भाजपचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबर देखील पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. यामुळे ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसे यांच्या प्रवेशाची बातमी आमच्यासाठी सुखद आहे, असं जयंत पाटील यांनी काल म्हटलं होतं.
तसेच जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील सांगितला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवन पुन्हा तळपला! या आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला
चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याची भरदिवसा चाकूने वार करून ह.त्या
ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला