मुंबई | नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची सरबत्ती केली. मलिक यांच्या या आरोपानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलं.
हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे.
मलिक यांनी तसाच प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही. राज्य सरकारच्या यंत्रणा कामाला लागूनही ते फडणवीसांवर आरोप लावू शकले नाहीत, असं शेलार म्हणाले.
गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कोणताही गैरकारभार फडणवीसांच्या काळात झाला नाही. 14 कोटींच्या बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला हाजी अराफतचा भाऊ इम्रान आलम शेख हा तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता, असं त्यांनी सांगितलं आहे.
जेव्हा त्याच्यावर आरोप झाला तेव्हा तो काँग्रेसच्या पदावर होता. आता तुम्ही आरोप करताय, पण तो तर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मलिक हे तथ्यहिन बोलत असल्याचं सिद्ध होतं, असा दावा त्यांनी केला. हाजी हैदर हा बांगलादेश तर सोडा, पण मुंबईत त्यांच्यावर कोणताही आरोप नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दिवाळीपूर्वी मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी काही तासात मीडियासमोर येऊन मलिक यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
आज मलिक यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर फडणवीसांनी केवळ ट्विट करून त्यांना उत्तर दिलं. तेही एका सुविचाराचा आधार घेत फडणवीसांनी उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘बिग बाॅस 15’: अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर
“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”