23व्या वर्षी दृष्टी गेलेला ‘हा’ व्यक्ती आहे एका कंपनीचा मालक, सर्व कर्मचारीही दृष्टिहीन!

नवी दिल्ली | प्रत्येकाच्या जिवनात दुःख येतात पण आपण दुःखाला मोठं समजायचं की त्यांच्यावर मात करायची, हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यात काही असेही लोक असतात, जे स्वतःला प्रोत्साहित करून सर्व ठीक होईल, या आशेने धैर्य ठेवतात आणि नेहमी प्रयत्न करत राहतात.

तुम्हाला अशाच एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत, ज्यांनी जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेऊन यशस्वी वाटचाल केली. महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कथा आहे. लहानपणापासून त्यांना डोळ्यांनी अगदी थोडेसे दिसत होते. पण वयाच्या २३ व्या वर्षी भावेश भाटिया यांची पूर्ण दृष्टी जाऊन ते दृष्टिहीन झाले.

त्या वेळी ते एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. पण त्यांची दृष्टी गेल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकले. त्यांच्या जीवनातील दुःख कमी होण्याऐवजी वाढतच होते. त्यातच त्यांच्या आईला कर्करोग झाला. आता त्यांना आणि आईला या दोघांनाही उपचारासाठी पैशांची नितांत गरज होती. त्यांची आई त्यांच्यासाठी सर्वस्व होती. कारण त्यांनी जीवनातील दिशा दाखवण्याचे काम केले होते.

पैशांच्या अडचणीमुळे आईचा उपचार होऊ शकला नाही, काही दिवसातच त्यांचेही निधन झाले. भावेश यांना आपल्या आईसाठी काहीतरी मोठे करायचे होते. पण त्यांच्या एवढ्या लवकर जाण्याने त्यांच्या मनात ती गोष्ट घर करून राहिली. यातच ते एकटे पडले. पण भावेशच्या आईने त्यांना सांगितले होते की, तू जग पाहू शकत नाहीस म्हणून काय झालं ? तू असं काहीतरी कर की, जग तुझ्याकडे बघेल.

यानंतर भावेश आत्मविश्वासाने खडबडून जागे झाले आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक नव्या प्रवासावर जाण्यास निघाले. भावेश यांना लहानपणापासून हाताने वस्तू बनवण्याची आवड होती. ते कधी पतंग, तर मातीपासून खेळणी आणि मूर्ती बनवायचे. मग भावेश यांनी १९९९ मध्ये मुंबईतील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडमध्ये (एनएबी) प्रवेश घेतला. तिथे त्यांनी चार महिने मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी अ‌ॅक्युप्रेशर थेरपी आणि ब्रेल लिपी याचेही प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण पैसे नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मग त्यांनी महाबळेश्वरमधील हॉटेलमध्ये मसाज आणि अ‌ॅक्युप्रेशर थेरपी करण्यास चालू केले. या कामातून त्यांच्याकडे पैसे येऊ लागले मग त्यातले काही पैसे ते वाचवू लागले. बचत केलेल्या पैशातून त्यांनी पाच किलो मेण आणि तो बनवण्याचा साचा विकत घेतला.

मग त्यांनी हॉटेलजवळ चर्चच्या समोर मेणबत्ती विकण्यास चालू केले. या कमाईतुन ते २५ रुपयांची बचत करत होते. पुढच्या दिवशी त्या २५ रुपयाचे मेण विकत घेऊन ते बनवायचे. हा प्रयोग त्यांनी काही दिवस चालू ठेवला. भावेश आता आनंदी होते कारण ते त्यांच्या आवडीचे काम करत होते. एके दिवशी त्यांच्याकडे एक महिला मेणबत्ती खरेदी करण्यासाठी आल्या. त्यांचा स्वभाव खूपच नम्र होता आणि त्यांचे हास्यही खूपच विशेष होते. हे भावेश यांना खूप आवडले. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. त्यांचे नाव नीता होते.

यानंतर भावेश आणि नीता यांना एकमेकांवर प्रेम झाले. मग त्यांनी लग्न करायचे ठरवले. पण नीता यांचे कुटुंबीय एका गरीब आणि अंध व्यक्तीशी लग्न करण्यास नकार दिला. पण नीता यांचा निर्णयापुढे कुटुंबीयही झुकले. त्यांचे लग्न झाल्यावर ते महाबळेश्वरमध्ये एका छोट्याशा घरात राहू लागले. नीता या खूपच आशावादी होत्या. त्यांनी वेळोवेळी आपल्या पतीला मदत केली. यानंतर त्यांनी एक दुचाकी खरेदी केली. मग भावेश शहरात मेणबत्ती विकण्यास जाऊ लागले. त्यांचे काम उत्तम चालले होते.

त्याच दरम्यान नीता यांनी चार चाकी गाडी शिकल्या. यामुळे त्यांना जास्त प्रमाणात मेणबत्ती विकण्यास नेता येऊ लागले. नीता या भावेश यांच्या जीवनातील प्रकाश होत्या. यानंतर भावेश यांना खास दृष्टिहीन लोकांसाठी असलेल्या एका योजनेअंतर्गत सातारा सहकारी बँकेतून १५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. यातून त्यांनी १५ किलो मेण, विविध प्रकारचे साचे आणि गरजेच्या वस्तू विकत घेतल्या. त्यांच्या एका मित्राला त्यांचे काम खूपच आवडले.

त्या मित्राने त्यांच्यासाठी एक संकेतस्थळ बनवून त्यांना भेट दिली. त्या संकेतस्थळावर भावेश यांच्या विविध वस्तूंचे चित्रासहित माहिती दिली होती. त्यांना संकेतस्थळाद्वारे मोठं-मोठ्या ऑर्डर मिळू लागल्या. यातून त्यांनी ‘सनराईज कँडल्स’ हा उद्योग समूह उभारला. भावेश यांना २०१४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे. आज त्यांची कंपनी ९००० डिजाईनच्या विविध मेणबत्त्या बनवण्याचे काम करते. त्यांना दिवसाला २५ टन मेणाचा उपयोग होतो. भावेश हे मेण ब्रिटनमधून खरेदी करतात.

त्यांचे ग्राहक रिलायन्स इंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब असे त्यातील काही प्रमुख नावे आहे. त्यांच्या या कंपनीत २०० कर्मचारी काम करत असून ते सर्व दृष्टिहीन आहे. प्रशासनाचे सर्व काम नीता सांभाळतात. भावेश यांचे कौशल्य इथपर्यंतच थांबलेलं नाही तर त्यांना खेळाचीही विशेष आवड आहे. त्यांनी पॅराऑलम्पिकमध्ये १०९ पदके मिळवली आहे. खरंतर दृष्टी असलेल्या लोकांनी दृष्टिहीन लोकांना वाट दाखवण्याची गरज असते पण भावेश हे स्वतः दृष्टिहीन असून त्यांनी दृष्टी असलेल्या लोकांना एक सकारात्मक मार्ग दाखवला आहे, यात तिळमात्र शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पक्षांतराची बातमी ऐकताच भाजपचा ‘तो’ नेता मला फोन करून म्हणाला…’; एकनाथ खडसेंचा धक्कादायक खुलासा!

शिखर धवन पुन्हा तळपला! या आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याची भरदिवसा चाकूने वार करून ह.त्या

ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला