अर्ज भरताना दहा हजार रूपयांची चिल्लर, उमेदवाराला दंड… दंड भरताना पण चिल्लरचं

शिर्डी : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मच्छिंद्र देवराव मुंगसे या अपक्ष उमेदवाराने डिपॉझिट भरण्यासाठी दहा हजारांचे चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीतून आणल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तेव्हा दंड भरतानाही पठ्ठ्याने सुटी नाणीच दिली.

एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना दंड होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी. नेवासा तालुक्यातील देवगावमध्ये राहणाऱ्या मच्छिंद्र देवराव मुंगसे यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंगसे यांनी शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली व्यक्तिरेखा निवडणुकीचा अर्ज भरताना दहा हजारांचे चिल्लर डिपॉझिट म्हणून घेऊन गेल्याचं दाखवलं आहे.

सुटे पैसे मोजताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आल्याचंही सिनेमॅटिक पद्धतीने दाखवलं होतं. त्यानंतर विविध निवडणुकांच्या वेळी उमेदवार चिल्लर नेण्याची स्टंटबाजी करताना दिसले. 

प्लास्टिक बंदी असतानाही अनामत रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी पाहिलं. प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करत मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला. 

महत्वाच्या बातम्या-