आठवलेंनी सांगितला भाजपसोबतच्या युतीचा फॉर्म्युला, म्हणाले, ‘रिपाइंचे ‘इतके’ नगरसेवक निवडून आणा’

मुंबई | महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागण्याचे आवाहन रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीच वर्षे रिपाइंचा उपमहापौर तर भाजपचा महापौर होईल. तसेच नंतरची अडीच वर्षे रिपाइंचा महापौर होईल, असं भाजप सोबत ठरलं असल्याचं आठवले यांनी यावेळी जाहीर केलं आहे.

रिपाइंने विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

मुंबईतील उत्तर भारतीयांच्या संकटात रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे. उत्तर भारतीयांचे रोजगार, घर आदी सर्व प्रश्नांवर नेहमी रिपब्लिकन पक्षाने संघर्ष केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे. झोडपट्टीवासीयांचे गरिबांचे नोकरीचे घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर रिपब्लिकन पक्ष आहे, असं ते म्हणालेत.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून आरपीआय उत्तर भारतीयांनाही मुंबई मनपा निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाला साथ द्यावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच रिपब्लिकन पक्षानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली”

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?