अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; दिले हे आदेश

नवी दिल्ली | अयोध्या जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थ समितीला दोन आठवड्यांमध्ये प्रगती अहवाल देण्याचे आदेश दिेले आहेत.

अयोध्या जमीन वाद प्रकरणी मध्यस्थी समितीचं काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यानं न्यायालयानं जलद सुनावणी घ्यावी, अशी मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज (गुरूवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या कामात कोणतीही विशेष प्रगती नसल्यानं न्यायालयानं याप्रकरणी सुनावणीची तारीख द्यावी, अशी मागणी वरिष्ठ वकिल के.परासरन यांनी केली आहे. यावरच मुस्लिम पक्षकारांच्या वतिनं डॉ. राजीव धवन यांनी प्रतिवाद करून समितीवर टीका करण्याची ही वेळ नसल्याचं म्हटलं आहे. 

दोन्ही पक्षकारांनी बाजू मांडल्यावर न्यायालयानं भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी मध्यस्थ समितीची स्थापना केलेली आहे. त्यांच्या अहवालाची वाट पहावी लागेल. आधी त्यांना त्यांचा अहवाल सादर करू दे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.