“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”

हिंगोली | शिवसेनेत सध्या पक्षांतराचे वारे सुरु आहेत. शिवसेनेला स्थापनेपासून सर्वात मोठा धक्का सध्या बसला आहे. सुरुवातीला 40 आमदार आणि बघता बघता 12 खासदार शिवसेना सोडून शिंदे गटात पळाले.

शिवेसेनेच्या या पडत्या काळात पक्षाला सावरण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रा करत महराष्ट्रभ्रमण करीत आहेत. त्यांची आज पुण्यात सभा आहे. आपल्या सभांमध्ये ते बंडखोरांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

शिवसेनेतून जरी अनेक आमदार, खासदार आणि नेते गेले असले, तरी काही अजून शिवसेना पक्षासोबत प्रामाणिक आहेत. त्यातील एक म्हणजे हिंगोलीतील नेते बबन थोरात (Baban Thorat). त्यांनी आता शिवसैनिकांना एक आगळेवेगळे आव्हान केले आहे.

गद्दारांच्या गाड्या जो शिवसैनिक फोडेल त्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सत्कार केला जाईल, असे बबन थोरात यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. ते हिंगोली जिल्ह्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत होते.

बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar), खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करत हिंगोलीत जोरदार निदर्शने करण्यात आली, यावेळी बबन थोरात बोलत होते.

आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एक मेळावा आयोजित करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी ते भर सभेत रडले देखील होते. नंतर तेच शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल झाले.

त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेने नवे संपर्कप्रमुख म्हणून बबन थोरात यांची नियुक्ती केली होती. यानंतर बबन थोरात आणि काँग्रेसमधून परत आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मोठ्या प्रमाणात शिनवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. महावीर भवनात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाषणात गद्दारांच्या गाड्या फोडण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या – 

“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर

‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या

भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’

फोन लावण्यासाठी मी पायलटला विमान थांबवायला सांगितलं- एकनाथ शिंदे