राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण?? काँग्रेसचे नवे कॅप्टन म्हणतात…

अहमदनगर | मरगळलेल्या काँग्रेसला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात खांदेपालट केला आहे. शनिवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री हा आघाडी शासनाचाच असेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवलाय. तो सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझी आहे. येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेऊ आणि राज्यात पुन्हा एकदा आघाडीचं सरकार स्थापण करू, असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवेसेना युतीच्या निमित्ताने लोकशाहीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं. काँग्रेस आणि मित्रपक्षांचा राज्यात मोठा जनसंपर्क आहे. त्याद्वारे आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहचू, असं थोरात म्हणाले.

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक वेगळी असते. राज्यातील जनता नक्की आमच्या पाठीमागे उभा राहिल, असंही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. त्यामुळेच चव्हाण यांनी जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त होती. त्यांच्याच जागी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या साथीला नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम आणि बसवराज पाटील यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.