बाळासाहेबांनी आधी संजय दत्तला वाचवलं; नंतर म्हणाले त्याला फाशीवर चढवा…

मुंबई | राजकीय नेते आणि सिने अभिनेत्यांची दोस्ती ही गेली अनेक दशकं महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. अशोक चव्हाण-महेश मांजरेकर, उद्धव ठाकरे-अवधूत गुप्ते, बाळासाहेब ठाकरे-दादा कोंडके अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. यामध्ये एका मैत्रीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ती मैत्री म्हणजे सुनिल दत्त-बाळासाहेब ठाकरे. ही मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती. या मैत्रीचे अनेक किस्से अनेकजण अनेक प्रकारे सांगत असतात. मात्र या मैत्रीचा  एक वेगळा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे नेमका हा किस्सा??

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधरित ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि सुनील दत्त यांच्या मैत्रीचा किस्सा उलगडून दाखवण्यात आला आहे. 

1993 साली मुंबईत साखळी बाॅम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात संजय दत्त याच्यावर आरोप झाले आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. यानंतर काही दिवसांनी सुनिल दत्त आपल्या जिवलग मित्राच्या बाळासाहेब ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर पोहचले. संजयला आपण मदत करावी… त्याला आपण तुरूंगातून बाहेर काढावं, अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी केली.

जिवलग मित्रासाठी कायपण-

मदत करताना बाळासाहेब ठाकरे सुनिल दत्तला म्हणाले, मी तुझ्यासाठी हे सगळं करतोय. संजयचं मला काहीही देणघेण नाही, असं म्हणतं बाळासाहेबांनीही आपल्या जिवलग मित्राला निराश केलं नाही. आपल्या करिश्म्याने बाळासाहेबांनी संजय दत्तला मदत केली आणि संजय दत्त जेलबाहेर सुटून आला. यानंतर संजय दत्तने बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले होते. त्याला त्याच्या भावना देखील आवरता आल्या नव्हत्या. तो ढसाढसा रडला होता.

नंतर म्हणाले त्याला फाशी द्या मला काही फरक पडत नाही…

1993 मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त काही काळ जेल भोगून आला होता. मात्र संजय दत्तवर आरोप सिद्ध झाले आणि संजय दत्त चौकशीच्या फेऱ्यात अडकला. यावर बाळासाहेब ठाकरेंना त्यावेळी विचारले असता, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या मला काही फरक पडत नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.