“योगीजी, कामगार-मजूरांना ‘आई’ सांभाळत नाही म्हणून ‘मावशी’कडे येतात”

मुंबई | उत्तर प्रदेशातले सत्ताधारी रोजगार निर्माण करू शकले नाहीत म्हणून तिथले लोक महाराष्ट्रात येतात. आई सांभाळत नाही म्हणून मावशीकडे येतात. दोन महिने त्यांच्याकडे काम, पैसा नसताना मावशीने त्यांना व्यवस्थित सांभाळले. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समजून घ्यावे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उ. प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मजुरांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशा शब्दात आदित्यनाथ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लॉकडाऊनमध्ये 2 महिने महाराष्ट्र शासनाने लाखो स्थलांतरित मजूरांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सांभाळले. त्यांनी घरी जायची इच्छा व्यक्त केल्याने मोफत प्रवासाची व्यवस्था केली. उत्तर प्रदेशात पोहोचल्यावर त्यांचे जे हाल होत आहे त्याकडे योगी आदित्यनाथ यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला थोरातांनी योगींना दिला आहे.

दुसरीकडे राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार कठोर नियम असलेलं धोरण करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

-राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

-बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

-राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

-मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!