देश

धक्कादायक! दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करण्यासाठी पत्नीनं रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं… अशा ओळी आपण नेहमीच ऐकत असतो. प्रेमासाठी लोक काय करतील सांगता येत नाही. बरं प्रेम सिंगल लोकांनाच होतं असंही नाही. विवाहित लोकसुद्धा प्रेमात पडतात. मग ते आपलं प्रेम मिळवण्यासाठी कुठल्या थराला जातील हे काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एक अशीच घडना घडली आहे. प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी विवाहित प्रेयसीनं चक्क स्वतःच्याच मरणाचा कट रचला. घटना उघडकीस आली तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

नेमका काय आहे हा प्रकार?

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील रुबी नावाच्या तरुणीचं जानेवारी 2016 मध्ये राहुल नावाच्या मुलासोबत लग्न झालं होतं. एक दिवस रुबी अचानक गायब झाली. रुबीचा शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही. रुबीच्या वडिलांनी पोलीस ठाणं गाठलं आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली.

हुंड्यासाठी राहुल आणि त्याच्या घरच्यांनी माझ्या मुलीचा छळ केला आणि तिला ठार मारलं, असा रुबीच्या वडिलांचा आरोप होता. पोलिसांना या प्रकरणात काही तथ्य वाटलं नाही त्यामुळे त्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. रुबीचे वडील इथंच थांबले नाहीत त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जुलै 2018 मध्ये एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी नेमका कसा केला तपास?

एफआयआर दाखल होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. रुबीचा मृतदेह सापडला नव्हता ही पोलिसांना सर्वाधिक विचार करायला लावणारी गोष्ट होती. 

तपास सुरु केल्यानंतर आम्हाला रुबीचा मृतदेह सापडला नाही. तपासा दरम्यान आम्हाला रुबीचे फेसबुक अकाऊंट अॅक्टीव्ह असल्याचे लक्षात आले. आम्ही 2 महिने तिच्या फेसबुक अकाऊंटच्या अपडेटवर लक्ष ठेऊन होतो तसेच तिच्या मोबाइल फोनचीही टेहळणी सुरु केली.- व्ही.पी.श्रीवास्तव, बाराबंकीचे एसपी

रुबीचं फेसबुक अकाऊंट अॅक्टीव्ह होतं ही बाब पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. पोलिसांनी तिच्या फेसबुक अकाऊंटवर लक्ष केंद्रीत केलं. फेसबुक आणि कॉल रेकॉर्डमुळे रुबी दिल्लीत असल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांनी थेट दिल्ली गाठली आणि रुबी व तिचा दुसरा नवरा रामूला अटक केली. 

रामूबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली रुबीने तपासादरम्यान पोलिसांना दिली. पोलिसांनी आता तिचा पहिला पती राहुल विरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घेतला आहे. आपल्या मुलीची हुंड्यासाठी हत्या झाली हा आरोप करणं रुबीच्या वडिलांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. तिच्या वडिलांविरोधात न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून कलम 182 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.