बीडमध्ये ‘सैराट’ सिनेमाची पुनरावृत्ती; भावाने बहिणीच्या नवऱ्याला संपवलं

बीड : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमानं साऱ्या देशाला हादरवून सोडलं होतं. अनेकांनी या सिनेमाला विरोध केला होता. असं कुठं असतं?, असं त्यांचं म्हणणं होतं. सैराट सिनेमा येण्याआधीसुद्धा अशा घटना घडत होत्या आणि अजूनही घडत आहेत. आताही बीडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात वार करुन संपवलं आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना बीड जिल्ह्यातील गांधी नगरमध्ये घडली आहे. सुमीत वाघमारे असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे, तर बालाजी लांडगे असं मारेकऱ्याचं नाव आहे. लांडगे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

नेमका काय आहे हा प्रकार?

बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्री लांडगे आणि सुमीत वाघमारे यांची घट्ट मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोबत जगण्याच्या आणि सोबतच मरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या. भाग्यश्रीच्या घरच्यांना मात्र हे लग्न मान्य नव्हतं. त्यांनी या लग्नाला विरोध केला. मात्र भाग्यश्रीने त्यांच्या विरोधाला जुमानलं नाही. तिनं त्यांचा विरोध मोडून काढला. दीड महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्ट मॅरेज केलं. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एक रुम भाड्याने घेऊन दोघेही राहत होते.

भाऊच काळ बनून आला-

लग्न केल्यापासून भाग्यश्रीच्या घरच्यांच्या डोक्यात संताप होता. दोन महिन्यांपासून या प्रेमी जोडप्याचा शोध सुरु होता.  कालचा दिवस मात्र सुमीतसाठी काळ बनून आला. 

काल सुमित आणि भाग्यश्रीची परीक्षा होती. पेपर संपवून ते संध्याकाळी पाच वाजता आदित्य महाविद्यालयाच्या बाहेर पडले. मात्र तिथेच भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र बसले होते. भाग्यश्री आणि सुमीत दोघांनाही याची पुसटशी कल्पना नव्हती.

महाविद्यालयाच्या बाहेरच भाग्यश्री आणि सुमीतवर अचानक हल्ला चढवण्यात आला. हल्ल्यात सुमीत गंभीर जखमी झाला. सुमीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना भा्ग्यश्रीने टाहो फोडला. हल्लेखोर असलेला तिचाच भाऊ आपल्या साथीदारांसह तिथून पसार झाला. भाग्यश्री आरडाओरड करत होती. उपस्थितांना आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी गयावया करत होती. मात्र तिथे उपस्थित असलेल्या एकाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. ती आक्रोश करत राहिली. 

सुमीतला वाचवण्यासाठी रिक्षाचालक सरसावला-

भाग्यश्री जीवाच्या आकांताने नवऱ्याला वाचवण्यासाठी ओरडत होती. एका रिक्षाचालकाने पुढे होत सुमीतला रिक्षात टाकून बीड जिल्हा रुग्णालयात नेलं. रिक्षाचालकाने प्रयत्न अपुरे पडले. रस्त्यातच सुमीतची प्राणज्योत मालवली होती. 

कुणीही मदतीला धावलं नाही-

सुमीत आणि भाग्यश्री परीक्षा संपवून बाहेर पडले होते. परीक्षा असल्यामुळे आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाबाहेर गर्दी होती. महाविद्यालयाबाहेरच हे हत्याकांड घडलं त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात माणसं होती. मात्र सुमीतवर हल्ला झाला त्यावेळी कुणीही पुढे होऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकानं गेट लावल्याचा आरोप सुमीतच्या नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांचा आक्रोश, पोलिसांचा तपास-

हत्याकांड घडल्यानंतर काही वेळातच बीड पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत सर्व मारेकरी पसार झाले होते. मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी मागणीसाठी मध्यरात्रीपर्यंत बीडच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मार्गावर असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असं आश्वास पोलीस उप अधीक्षक सुधीर खेडकर यांनी दिलं आहे.

आणखी महत्त्वाच्या घडामोडी-