“लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात”

मुंबई | आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.

एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारस्तंभ होत्या. सर्व सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यामुळे आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे. बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या, असं रश्मी ठाकरे म्हणाल्या.

प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला असून एक महान पर्व संपले आहे. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला आहे. लतादीदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं की, आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्नं करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील, असं ते म्हणाले.

आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार!

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार 

कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, मातृतुल्य आशीर्वाद हरपला- उद्धव ठाकरे