“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.

आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सरकारला घेरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आज अधिवेशनात कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहे.

अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अधिवेशनाचा कालावधी वाधवून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे.

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील अधिवेशन संपवतील’, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. एक आठवडा अधिवेशन वाढवण्याची आमची मागणी असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

‘आज बघितलं तर महाराष्ट्रासमोर 200 प्रश्न आहेत. जनतेचे अनेक प्रश्न आहेत जे मांडायचे आहेत. त्यासाठी सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा’, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार, कामगार व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यावर चर्चा करण्यासाठी एक जागा आहे ती म्हणजे विधानभवन. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी आम्ही आग्रही राहू’, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.

आज सभागृहामध्ये पेपर फूटी विषयावर विरोधक म्हणुन आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. सगळे विषय सविस्तर मांडू, असं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

‘पुरवणी मागण्या मंजूर करून घेणे, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे यामध्ये सरकारला रस आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळवायची आहेत’,असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

‘हे लोकशाहीचं मंदीर आहे. लोकशाहीचा अनादर दाखवण्याचं काम कोणीही दाखवू नये. आजचं कामगार सुरळीत चालावं’, अशी अपेक्षा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज

फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…

दिलासादायक! रूग्णालयात भरती न होता omicron बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त

राज्यात नाईट कर्फ्यू लागणार का?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक