औरंगाबाद महाराष्ट्र

आम्हाला फितूर सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवलं जातंय; भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा

उस्मानाबाद : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मराठा आमदारांना लक्ष्य केल्यानंतर मराठा समाजाने आता सत्ताधारी भाजपमधील मराठा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी भाजपमधील मराठा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष देविदास साळुंके यांनी अशाच प्रकारे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्यात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. पक्षाशी निष्ठावंत असलेल्या देविदास यांना राजीनामा देताना खूपच वेदना होत असल्याचं दिसत आहे. 

सत्तेत आल्यानंतर पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. मात्र ते अद्याप पूर्ण केलेलं नाही. आम्ही भाजपला सत्तेत आणण्यासाठी परिश्रम घेतले. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना भाजपला मतदान करण्यास सांगितलं, मात्र तेच लोक आता आम्हाला सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत, असं त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलंय. 

जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्याकडे देविदास साळुंके यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या या  राजीनाम्यात केली आहे. 

देविदास साळुंके यांचं राजीनामापत्र-