नागपूर महाराष्ट्र

‘भाजप’ला मोठा धक्का; खोट्या आश्वासनाला कंटाळून आमदाराचा राजीनामा

नागपूर | निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. नाना पाटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर विदर्भातील आणखी एका भाजप आमदाराने आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. डॉ. आशिष देशमुख असं त्यांचं नाव असून ते नागपूरच्या काटोलमधून आमदार होते. त्यांनी फॅक्स आणि ईमेलद्वारे राजीनामा पाठवला आहे. उद्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची ते भेट घेणार आहेत. बागडे यांना ते यावेळी आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत. 

राहुल गांधी यांची भेट-

आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ते आज वर्ध्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या भेटीमुळे आशिष देशमुख काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख काटोलमधून भाजपचे आमदार होते. त्यांचे वडील रणजीत देशमुख काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील होते. भाजप सोडल्यानंतर आशिष देशमुख काँग्रेसमधील परततील ते यामुळे, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. 

नक्की का दिला राजीनामा?-

आशिष देशमुख स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आग्रही होते. डिसेंबर महिन्यात त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लांबलचक पत्र देखील लिहिलं होतं. या पत्रात आशिष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ का मिळावा, याचा उहापोह केला होता. स्वतंत्र विदर्भ मिळाला नाही तर आपण राजीनामा देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. 

राष्ट्रवादीसोबतही जवळीक-

आशिष देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही जवळीक आहे. डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत विधानसभेत एन्ट्री मारली होती. अजित पवार यांच्यासोबत विधानसभेत एन्ट्री मारल्यामुळे त्यावेळी या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली होती. 

काय म्हणाले आशिष देशमुख?-

सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नही ….
महात्मा गांधीजींच्या या शिकवणीतून प्रेरणा घेत आज मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे. लोकतांत्रिक देशामध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अत्यंत गंभीर आहे .

शेतकरी, वेगळा विदर्भ , बेरोजगारी यांसारख्या विषयांवर माझा आवाज आणखी बुलंद करण्याचे वचन आज मी आपणास देतो व सांगू इच्छितो कि मी माझ्या आमदारकीचा राजीनामा आदरणीय विधानसभा अध्यक्ष श्री.हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जय भारत , जय हिंद , जय विदर्भ … -आशिष देशमुख