दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

मुंबई | राज्य सरकारने अजुनही जाहीरपणे व्यायामशाळा आणि मंदिर खुली करण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. मात्र राज्यभर सध्या मंदिर खुली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती. मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय?, अशी गंभीर टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.

सध्या लोकांच्या भावना आणि परिस्थीत अशी आहे की सरकारला मंदिर खुली करावीच लागतील कारण यांना दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं भातखळकरांनी म्हटलं आहे.

टाळेबंदीची शिथीलता होत असताना बससेवा, मेट्रो, शॉपिंग मॉल सुरू झाले आहेत. मग नागरिकांच्या श्रद्धेसाठी मंदिरं उघडायला काय हरकत आहे? सोशल डिस्टन्सिंग पाळून लोक दर्शन घेतील, असं भातखळकर म्हणाले आहेत.

कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी रुग्णालयातील खाटा राज्य सरकारने ताब्यात घेणे आणि उपचाराचे दर नियंत्रित ठेवण्याविषयीचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलण्याचं आवाहनही भातखळकर यांनी केलं आहे. दरम्यान आज प्रकाश आंबेडकर यांनीही पंढरपूर येथे आंदोलन केलं.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरला जात तेथे आंदोलन केलं. विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरं सुरु करण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं.  राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.

लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.

दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या गाईड लाईन्समध्येही मंदिर आणि व्यायामशाळा उघडणयाबाबत कोणतीही घोषणा केली नाही.

 

महत्वाच्या बातम्या-