बीड जिल्ह्यातील माजलगावचे भाजप आमदार आणि पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होतोय. राजेवाडी या गावी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आमदार आर. टी. देशमुख दुपारच्या सुमारास राजेवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमावरून परत येत असताना गाडीत बसताना गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्ते आणि उपसरपंचाच्या पतीने आमदारांची गाडी अडवली. तसेच त्यांना मारहाण केली.
गेल्या चार वर्षात आमच्या गावात विकास कामे का केली नाहीत? असा प्रश्न आमदार देशमुख यांना विचारण्यात आला. यावेळी आमदारांचे स्वीय सहाय्यक पवार आणि गाडीचे चालक यांना देखील मारहाण आणि धक्काबुकी केल्याचा तसेच त्यांचा मोबाईल फोडल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती मिळताच कार्यक्रमाचे आयोजक तातडीने धावून आले आणि आमदारांभोवती सुरक्षाकडे करून त्यांना वाचवण्यात आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. आमदार देशमुख यांना पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिस गाडीमध्ये बसून तेथून रवाना करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.