हरियाणाच्या हिस्सारमध्ये भाजप आमदाराला नागरिकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. कमल गुप्ता असं या भाजप आमदाराचं नाव आहे. कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
नेमका प्रकार आहे तरी काय?
हिस्सारच्या सेक्टर 16 आणि 17 मधील काही लोक आमदार महोदयांच्या घरासमोर निदर्शनं करत होते. सेक्टरच्या जमिनींसंदर्भात त्यांच्या काही मागण्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून ही निदर्शनं सुरु होती.
मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला जाण्यासाठी आमदार महोदय आज घराबाहेर पडले. यावेळी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या गाडीपुढे येत त्यांना जाण्यास विरोध केला. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आमदारांनी मागच्या दाराने जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिकडेही आंदोलकांनी त्यांच्या गाडीपुढे ठिय्या मांडला.
आमदार आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी त्यांचे कपडे फाडले तर काहींनी काळ्या झेंड्याचे दांडू काढून आमदारांना मारहाण केली.
आमदार काय म्हणाले?
माझ्यासोबत जे झालं त्यामुळे मला खूप दुःख झालं आहे. असं नको करायला पाहिजे होतं. नागरिकांच्या मागण्या मी मागेच मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत. घेराव घालण्याच्या नावाखाली माझे कपडे फाडण्यात आले. मला मारहाण करण्यात आली. – डॉ. कमल गुप्ता, आमदार
पोलीस काय म्हणाले?
आमदार महोदयांना झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही 17 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनकर्त्यां महिलांनी देखील तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. -संदीप सिंह, पोलीस ठाण्याचे प्रभारी