कोल्हापूर | यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्यावर कोरोनचं गहिरं संकट असताना सोहळा होणार की नाही? झाला तर तो कसा होणार? सोहळ्याचं स्वरूप काय आणि कसं असणार? सोहळ्याला किती लोक उपस्थित असणार? असे एक ना अनेक प्रश्न शिवभक्तांच्या मनात येत होते. परंतू प्रशासनाच्या आणि संभाजीराजेंच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घरा घरात’ या घोषवाक्याला प्रतिसाद देतशिवभक्तांनी सहकार्य केलं आणि रायगडावरचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थित नियम आणि अटी पाळून मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या भावना फेसबुक पोस्टच्या द्वारे लोकांसमोर मांडल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजे म्हणतात…
“6 जून 2020 ला रायगडच्या राजसदरेत यशस्वी झालेला राज्याभिषेका, निमित्ताने सर्व शिवभक्तांचे आभार! राज्याभिषेक सोहळ्याची यशस्वी वाटचाल हि, शिवभक्त आणि माझ्यामध्ये तयार झालेल्या ऋणानुबंधाला अभिवादन करणं किंवा या नात्याला समर्पित करणं मी उचित समजतो. या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने आभार व्यक्त करणं मला भावत नाही म्हणूनच, तुमच्याशी त्याच आपुलकीने संवाद साधण्याची माझी इच्छा आहे. मला आठवतंय, जेंव्हा 2018 ला राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर, गडाच्या खाली उतरत असताना, महादरवाज्यात प्रचंड मोठा शिवभक्तांचा जनसागर अडकून पडला होता. मला निरोप आला की, महादरवाज्यात खूप गर्दी झाली आहे. लोक फेटा तटाला बांधून खाली उतरत आहेत. अपघात होण्याची शक्यता आहे. पोलिस सुद्धा हतबल झाल्याचे दिसून आले. मग मी स्वतः खाली उतरून महादरवाज्यात आलो. शिवभक्तांना धीर दिला. त्या अडचणीच्या वेळी शिवभक्तांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सर्वांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. हळू हळू परिस्थिती नियंत्रणात आली.”
“मी तिथे सलग सहा तास उभा होतो. सर्व शिवभक्त गडाखाली उतरल्याची खात्री करून घेतली. त्यानंतरच रात्री 9 वाजता गडाखाली आलो. परंतु, त्या प्रसंगा नंतर एक पाताळयंत्री प्रचार यंत्रणा कामाला लागली. त्यांनी मोठ्याप्रमाणात असं बिंबवायचा प्रयत्न केला की, शिवभक्त हे अडमुठे आहेत. त्यांना शिस्त नाही. असे अनेक आरोप होत राहिले. काहींनी तर थेट मला हे सांगितलं, की पुढच्या वर्षी फार कमी शिवभक्त राज्याभिषेकासाठी रायगडावर येतील. माझ्या मनाला या गोष्टी पटल्या नाहीत. कारण माझा निरोप घेत असताना, प्रत्येक शिवभक्तांच्या डोळ्यातील भाव मला हेच सांगत होते की पुढच्या वर्षीही आम्ही येणारच. शिवभक्तांच्या विषयी लोकांची अशा प्रकारची चुकीची भावना असेल तर ती काही खरी नाही. शिवभक्त निराळे आहेत. मला हे बदलायचे होते. मी ठरवलं, की शिवभक्तांचे संस्कार कृती मधून जगाला दाखवून देऊ. मला एक गोष्ट लक्षात आली केवळ प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही. समिती आणि प्रशासन यामध्ये सुसंवाद निर्माण करून. आपण स्वतः नियोजन केले पाहिजे, म्हणून पुन्हा बारकाईने पाहणी केली. आम्ही आमच्या उणीवा शोधल्या. अभ्यास केला आणी, योजना ठरवली. पुढच्या म्हणजे 2019 च्या शिवराज्याभिषेकावेळी, काही महिने आधीच प्रशासनासोबत बैठका घेण्यास सुरुवात केली.”
“आम्ही वेगळ्या व नाविन्यपूर्ण सूचना प्रशासनाला देऊन नियोजन आखले. प्रशासनाने त्याप्रमाणे सहकार्य केल. त्यावर्षी चा राज्याभिषेक झाला, आणि मी स्वतः माईक हातात घेऊन होळीच्या माळावर थांबलो. शिवभक्तांना आवाहन केलं. शिस्त पाळण्याचा, एकमेकांची काळजी घेण्याचा आग्रह केला. प्रत्येक शिवभक्ताने माझ्या शब्दाचा मान राखत तो तंतोतंत पाळला. सर्व शिवभक्त सुखरूप खाली उतरले.यावर्षी गर्दीचा उच्चांक गाठला असतानाही दुपारीच गड जवळपास रिकामा झाला.शिवभक्त हा बेशिस्त असूच शकत नाही, हे आपण सर्वांनी आपल्या कृतीतून ठळक पणे दाखवून दिलं. शिवभक्त हा नियम पाळणारा आहे. संस्कारी आहे हे अपोआप साऱ्या जगाला दिसलं. माझ्या शिवभक्ताला कुणी नावं ठेवलेलं मला अजिबात आवडत नाही. कारण, मी जरी शिवछत्रपतींचा वंशज असलो, तरी सर्वात आधी मी एक शिवभक्त आहे. शिवभक्तांच्या ज्या भाव भावना असतील त्याच माझ्याही असतात.”
“यावेळी वेगळच संकट आपल्या देशावर, राज्यावर आणि आपल्या राज्याभिषेक सोहळ्यावर आलं. कोरोना महामारीपासून सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने शिवभक्तांनी एकत्र येणे योग्य नव्हते. मग यंदा राज्याभिषेक सोहळा साजरा होईल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला. राज्याभिषेक सोहळ्याला खंड पडू नये ही माझी आणि सर्व शिवभक्तांची इच्छा होती. त्याचं दायित्व माझ्याकडे आलं.”
“आता शिवभक्तांना विश्वास वाटायला लागला, राजेंनी जबाबदारी घेतली आहे, राज्याभिषेक आता होणारच. यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज मना मनात, शिवराज्याभिषेक घरा घरात’ या माझ्या घोषवाक्याला प्रतिसाद देत, सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांनी त्याचे तंतोतंत पालन केले.. स्वतःच्या घरावर स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा फडकवला. मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताचा सार्थ अभिमान आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शविला,आणि रायगडला न येणाचा निर्णय घेतला. यामुळेच महाराष्ट्राला असलेला संसर्गाचा धोका टळला. जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात येईल तेव्हा तेव्हा शिवभक्त राष्ट्राच्या मदतीला पुढे येतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला. तुम्हा सर्व शिवभक्तांच्या समोर मी नतमस्तक होतो. आणि सर्वांचे आभार मानतो.”
महत्वाच्या बातम्या-
-सोनू तू राऊतकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही- चित्रा वाघ
-‘कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र…
-महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले
-‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!
-कोकणच्या मदतीला भाजपा, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना- देवेंद्र फडणवीस