“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

मुंबई | बाबरी मशिद पतनात शिवसेना सहभागी होती. शिवसेनेचा सहभाग होता म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या, असा कबूलीनामा संजय राऊत यांनी दिला आहे. पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राऊत यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना राम मंदिर आंदोलनात सक्रिय असल्याचं म्हटलं होतं.

बाबरी पतन आणि अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचा सहभाग नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावाही राऊत यांनी फेटाळून लावला. त्यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही गुन्हा आणि खटला दाखल झाला होता. तेव्हा न्यायालय मूर्ख होतं का? त्याकाळात मुंबईतून उत्तर प्रदेशात शेकडो कारसेवक गेले होते. त्यांचा कोणताही पक्ष नव्हता. त्या काळातील सामना दैनिकाच्या रोजच्या अंकात कोण कुठून अयोध्येसाठी रवाना झाले आहे, याची माहिती प्रसिद्ध केली जात होती, असं राऊतांनी सांगितलंय.

मुंबईत वॉर रुम स्थापन करुन शिवसेना या सगळ्यावर नियंत्रण ठेवून होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कितीही वेगळी माहिती प्रसवली तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. मध्यंतरी अयोध्या लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत जाऊन वातावरण पुन्हा तापवलं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होते.

भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर त्यांनी आणला तर उत्तर देणं सोपं होईल. लोकांना कळेल भाजप कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला. भाजपचा जन्म 1980च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म 1969 सालचा. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद गुप्ते कधी झाले, त्यावेळी आमच्याकडे किती नगरसेवक होते या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेवू आणि जर कोणाला त्याचा अस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावात प्रमोद नवलकर आमचे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावातून आमचे छगन भुजबळ निवडून आले होते. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत अनेकदा, असा टोला लगावतानाच देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी संबंध नसेल महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल या सगळ्या गोष्टी श्री फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या-

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; Google ने घेतला हा मोठा निर्णय 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2024 मध्ये पराभव शक्य, पण…” 

राज्याच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी 

“भाजपनं आपल्या जन्माचा दाखला दाखवावा”; संजय राऊत संतापले