“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विचार करुन बोलावं”

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अधक्ष शरद पवार यांनी सरकारवर पाकिस्तानच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला होता. त्यालाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्‍तव्याचा देशापेक्षा पाकिस्तानलाच फायदा होतो याचे भान त्यांनी ठेवावे. तसेच मतांसाठी पवारांनी पाकिस्तानविषयी वक्‍तव्य करू नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

साताऱ्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीकास्त्र उगारले. पवार हे राजकारणातील बडे नेते आहेत त्यांनी आपल्या वक्‍तव्याचा कधी आणि कशासाठी वापर करावा याचे त्यांनी भान ठेवावे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना सुनावलं आहे. 

पाकिस्तान आणि भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना धारेवर धरलं आहे.  

काश्‍मीर प्रश्‍नावरून राहुल गांधींनी केलेल्या वक्‍तव्याचा पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्रात वापर करून घेतला. तसेच पवारांच्या वक्‍तव्याचा पाकिस्तान उपयोग करून घेईल, अशी भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

दरम्यान, पवारांनी अशी वक्‍तव्य करणं चुकीचं आहे. निवडणूका येतील आणि जातील पण त्याचा फायदा इतर देशाला होवू नये, असेही त्यांनी म्हटले. देशातील मुस्लिम जनतेला आपल्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतांसाठी पवारांनी असं वक्‍तव्य करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-