शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा

मुंबई | भाजपची आज गोरेगाव येथे कार्यसमितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपीय भाषण अतिशय घणाघाती करत आगामी विधानसभेच्या प्रचार भाषणांची झलक दाखवली. स्वपक्षातील नेते, मित्रपक्ष आणि विरोधकांना कोपरखळ्या मारत आणि गरज वाटेल तेव्हा चिमटे देखील काढले.

सध्या शिवसेना भाजपात मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगतो आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. मी तर सांगितलं आहे, मी पुन्हा येणार आहे.. काळजी करू नका…  परंतू मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत. तसे आपल्यात पण काही नेते आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला.

विधानसभेची निवडणूक युतीतच लढवणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच शिवरायांप्रमाणे रणनिती आखत विधानसभेचीही लढाई जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

मी एकटया भाजपचा नाही तर शिवसेना आणि RPI चा देखील मुख्यमंत्री आहे, असं म्हणत त्यांनी सेेनेच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

निवडणुकीआधीच पराभूत झालेल्या पक्षासमोर आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे आपल्याला डर नाही मात्र त्यांना कमजोर समजण्याचं काही कारण नाही, असं ते म्हणाले. युद्ध बदललं आहे म्हणून शस्त्र आणि रणनितीही बदलावी लागणार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

उमेदवारीवरून हमरीतुमरीवर येऊ नका. आपल्याला प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढायची आहे. उमेदवारीचा फॉर्म्युला ठरलाय. ज्याची जिंकून यायची क्षमता असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल. भाजपमध्ये वशिल्यावर नाही तर पात्रतेनुसार तिकीट मिळते हे लक्षात असू द्या. भाजप ही पब्लिक अनलिमीटेड पार्टी आहे. 5 वर्षातील सरकारचं काम निवडणुकीत बोलेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-मी अशा ठिकाणी जन्मलोय जिथली भाषा तुम्हाला कळत नाही- रावसाहेब दानवे

-‘मिशन वेस्ट इंडिज’! ‘या’ 15 जणांची भारतीय संघासाठी निवड

-…तर काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 10-10 जागा मिळतील- चंद्रकांत पाटील

…अन् जे. पी. नड्डांच्या सुरात चंद्रकांत पाटलांनी सूर मिसळला

-काँग्रेसच्या अवस्थेवर रावसाहेब दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना!