काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद; उमेदवारीवरुन काही नेत्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी!

मुंबई |  लोकसभेचा निकाल लागल्यापासून एकंदर काँग्रेसची काही बरी स्थिती नाहीये. लोकप्रियतेतही कमालीची घट झाली आहे. मात्र असं असतानाही विधानसभेसाठी आपापल्या समर्थकांच्या उमेदवारीचे प्रयत्न नेतेमंडळींकडून सुरूच आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 125 जागा आल्या आहेत. यापैकी 100 उमेदवारांची नावे छानणी समितीने निश्चित केली आहेत. याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी सोनिया गांधी व वेणूगोपाळ यांची भेट घेऊन उमेदवारांच्या यादीवरून तक्रारींचा पाढा वाचला.

अल्पसंख्याक, इतर मागासवर्गीय समाजाचे उमेदवार निवडून येतील असे मतदारसंघ मित्र पक्षांना सोडू नये, अशी भूमिका काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली होती. नेमके हेच मतदारसंघ राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाला का सोडताय? अशी भूमिका दलवाई यांनी घेतली आहे.

पक्षातील अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि नाराजी वरिष्ठ नेत्यांना कळवली असल्याची माहिती दलवाई यांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसची पहिली यादी शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र अंतर्गत वादामुळेच या यादीला उशीर झाल्याची चर्चा आहे. 

महत्वाच्या बातम्या-