देश

धक्कादायक!!! खोकला घालवण्यासाठी नव्हे नशा करण्यासाठी वाढलाय खोकल्याच्या औषधाचा वापर

मुंबई : दारु, सिगरेट, चरस, गांज्या अशा प्रकारची व्यसनं तुम्ही पाहिली असतील. मात्र आजच्या तरुणाईला एक असं व्यसन लागलं आहे जे अनेकांना सांगूनही खरं वाटणार नाही. खोकल्याचं औषध साधारणतः खोकला घालवण्यासाठी वापरलं जातं. मात्र आता याच खोकल्याच्या औषधाचं आजच्या तरुणाईला व्यसन लागलं आहे. खोकल्याच्या औषधाची वाढलेली विक्री या भयानक व्यसनाची तीव्रता सांगण्यासाठी पुरेशी आहे. आजच्या तरुणांमध्ये हे व्यसन झपाट्याने वाढ असून पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. या व्यसनाची वाढती व्याप्ती चिंतेचा विषय ठरली असून याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 

नेमकं काय आहे हे व्यसन?

डॉक्टरांकडून किंवा मेडिकलमधून दिल्या जाणाऱ्या खोकल्याच्या औषधामध्ये काही प्रमाणात अल्कोहोल देखील असतं. खोकला बरा व्हावा यासाठी ते वापरण्यात आलेलं असतं. मात्र आता खोकला बरा करण्याऐवजी त्याचा भलताच उपयोग व्हायला सुरुवात झाली आहे. खोकल्याचं औषध एका लिमिटमध्ये घ्यायचं असतं. मात्र ते मोठ्या प्रमाणात घेतल्यास नशा होऊ शकते. अनेकांकडून त्याचा गैरवापर सुरु झाला आहे. 

मागणी वाढली, मात्र नशेसाठी-

हिवाळा सुरु झाल्यामुळे सर्दी-खोकल्याच्या त्रासाला सुरुवात झाली आहे. तसा खोकल्याच्या औषधांना मागणी वाढली आहे. मात्र वाढलेली मागणी फक्त वातावरण बदलामुळे नाही तर नशेसाठी खोकल्याच्या औषधाच्या होणाऱ्या वापरामुळे आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने यंदा विविध प्रकारच्या कफ सिरपचा लाखो रुपयांचा साठा हस्तगत केला आहे. गर्दुल्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्ये या सिरपची मागणी वाढली असून, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही वापर होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नशेसाठी खोकल्याच्या औषधाचा वापर का?

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जविरोधात कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ मिळणं कठीण झालं आहे. स्थानिक पोलीस ठाणीसुद्धा यामध्ये लक्ष घालून आहेत, त्यामुळे गर्दुल्यांना अंमली पदार्थ मिळत नाही. अंमली पदार्थ मिळत नसल्याने गर्दुले आणि नशेखोरांनी आता पर्यायी मार्गांकडे आपला मोर्चा वळवला आहे. खोकल्याचं औषध सहज उपलब्ध होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सर्वात सोपा नशा करण्याचा मार्ग ठरला आहे.

सहज मिळतं, शंकाही येत नाही-

खोकल्याचं औषध कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतं. त्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीसुद्धा गरज लागत नाही. कुणी विचारलं तर खोकल्याचं कारण सांगता येतं. औषध जवळ बाळगता येतं. पोलिसांच्या हातात सापडण्याची शक्यता नसते. शिवाय अंमली पदार्थांची नशा करण्यापेक्षा हे स्वस्त आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे खोकल्याच्या औषधाचं व्यसन करणाऱ्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. 

खोकल्याच्या औषधांवर धडक कारवाई-

खोकल्याच्या औषधाचा नशेसाठी वापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने याविरोधात धडक कारवाया केल्या असून या कारवायांची शक्यता भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या बाटल्यांमध्ये कोडेन मिक्स सिरपच्या बाटल्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. 

पालकांनी मुलांकडे लक्ष देणं गरजेचं-

वाईट संगतीनं मुलं व्यसनांना लगेच बळी पडतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्यसनांचे अनेक भयावह प्रकार समोर येत आहेत. खोकल्याच्या औषधाचं व्यसन हा त्यातलाच एक भाग आहे. आपल्या मुलाकडे खोकल्याच्या औषधाची बाटली आढळली तर त्याला खोकला झाला आहे म्हणून अनेकदा दुर्लक्ष होऊ शकतं. मात्र असं दुर्लक्ष महागात पडू शकतं. 

IMPIMP