भारतीय संघाचा पराभव सहन झाला नाही: चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. भारताचा पराभव अनेक भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. 

भारताचा पराभव स्विकारु शकले नाही म्हणून एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. 

ओडिसाच्या कालाहंडीमधील सम्बारु भोई या 25 वर्षीय तरुणाने भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 

भारत जिंकणार यावर त्याचा विश्वास होता. त्याने याबाबत मित्रांसोबत पैजही लावली आहे. सामना झाल्यानंतर तो थेट शेतात गेला आणि त्याने शेतात जाऊन विष प्राशन केलं.

सम्बारु भोईला धर्मगडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, टीम इंडियाच्या पराभवानंतर बिहारच्या पाटण्यातील अशोक पासवान यांचं हद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे.